March 12, 2017

रिओ ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्यांचा ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मान

Written by

rio1

rio1
मुंबई – रिओ ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकून इतिहास रचणाऱ्या साक्षी मलिक, पी.व्ही सिंधू, दीपा कर्माकर व जितू राय यांना यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला असून यंदा प्रथमच चार खेळाडूंना ‘खेलरत्न’ हा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र कन्या ललिता बाबरला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.

राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडादिनी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. क्रीडा मंत्रालयाकडे यापूर्वीच ‘खेलरत्न’ आणि ‘अर्जुन’ पुरस्कार समितीने जिम्नॅस्ट दीपा कर्माकर व नेमबाज जीतू राय यांच्या नावाची ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस केली होती. या दोघांबरोबरच रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक आणि रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांनाही देशातील या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

शासनाच्या एका विशेष नियमात ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणाऱ्या वर्षात एकापेक्षा जास्त खेळाडूंना ‘खेलरत्न’ पुरस्कार देण्याची सोय करण्यात आली आहे. दीपा कर्माकर आणि जीतू राय यांची या पुरस्कारासाठी आधीच शिफारस झालेली असून साक्षी आणि सिंधूचे नावही या यादीत जोडले जाण्याचे संकेत आहेत.

यापूर्वी २००९ मध्ये कुस्तीपटू सुशील कुमार, बॉक्सर विजेंदर सिंग आणि मेरी कोम या तिघांचा एकाच वेळी ‘खेलरत्न’ पुरस्काराने गौरव झालेला आहे. २९ ऑगस्ट रोजी क्रीडादिनानिमित्त राष्ट्रपती भवनात प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते खेळाडूंचा ‘खेलरत्न’ आणि अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

The post रिओ ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्यांचा ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मान appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *