March 12, 2017

‘राष्ट्रवाद हे आपले शक्तिस्थळ’

Written by

modi

modi
सरकार वंचिताभिमुख असल्याची ग्वाही देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
नवी दिल्ली: राष्ट्रवादी विचार हा भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचा कणा असून समाजातील गरीब आणि वंचितांच्या उत्थानासाठी पक्ष आणि सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही सर्वसामान्य जनतेला द्यावे; असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना केले.

सर्व राज्यातील पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते यांना मोदी यांनी संबोधित केले. या मेळाव्याला देशभरातून ४०० कार्यकर्ते उपस्थित होते. मागील काही काळापासून गोरक्षणाच्या नावाखाली घडत असलेल्या दलितांवरील अत्याचारांच्या प्रकरणांवरून केंद्र सरकार, भाजप आणि संघ परिवाराला टीकेचे लक्ष्य व्हावे लागत आहे. हा आपल्याविरोधात जाणीवपूर्वक केला जात असलेला नियोजित अपप्रचार असून त्याला चोख उत्तर द्या आणि दलित, वंचित समाजाच्या मनात पक्षाचे आणि सरकारचे विधायक स्थान निर्माण करा; असे आवाहन या मेळाव्यात पंतप्रधानांनी केले.

भाजपच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेले केंद्रातील सरकार दलितांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यास अपयशी ठरत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचे समर्थपणे खंडन करा. पक्षाच्या कार्यकर्त्यांपैकी ८० टक्के कार्यकर्ते हे दलित, मागास, वंचित समाजातूनच आलेले असून त्यांचे हक्क आणि त्यांची आर्थिक, सामाजिक प्रगती याविषयी सरकार आणि भाजप संवेदनशील आहे; याची खात्री त्यांना करून द्या. सर्वसामान्य जनतेपर्यंत, विशेषत: समाजातील दलित, वंचित घटकांपर्यंत पोहोचून विरोधकांचा अपप्रचार उघडा पाडा; असे आवाहन मोदी यांनी या मेळाव्यात कार्यकर्त्यांना केले.

राष्ट्रवाद ही भाजपाची शक्ती असून पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादाला भाजपच्या विचारधारेत सर्वोच्च स्थान लाभले आहे. सध्या काही समाजविरोधी आणि फुटीरतावादी शक्तींकडून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. मात्र भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या ‘तिरंगा यात्रां’नी समाजाच्या सर्व घटकांना देशभक्तीच्या आणि राष्ट्रवादाच्या समान धाग्यात एकत्र आणण्याचे कार्य केले असल्याचा दावाही पंतप्रधानांनी केला.

दलितविरोधी ‘डॅमेज कंट्रोल’
गोरक्षणाच्या नावाखाली मागील काही काळापासून दलितांवर अत्याचार करण्याच्या घटना विविध राज्यात घडल्या. जुलै महिन्यात गुजरातमधील उना येथे चार दलित युवकांना गाय मारल्याच्या कारणाने कपडे काढून मारहाण करण्यात आली. गाडीला बांधून फरपटत नेण्यात आले. त्यानंतर काही अशाच घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा येथील जाहीर सभेत तथाकथित गोरक्षकांचे पितळ उघडे पाडले. दलित बांधवांवर अत्याचार करण्यापूर्वी आपल्याला गोळ्या घाला; असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. मात्र त्यानंतरही अशा घटनांची पुनरावृत्ती होत राहिली आणि विरोधकांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकार, भाजप आणि संघ परिवारावर टीकेची झोड उठविली. पुढील वर्षी उत्तरप्रदेशसह पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दलितविरोधी प्रतिमेचा फटका बसणे भाजपाला परवडणारे नसल्याने पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन ‘डॅमेज कंट्रोल’चे काम हाती घेतले आहे.

The post ‘राष्ट्रवाद हे आपले शक्तिस्थळ’ appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *