March 12, 2017

मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवा दरम्यान जड वाहतुकीवर निर्बंध

Written by

diwakar-raote

diwakar-raote
मुंबई – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवाच्या काळात जड-अवजड वाहने, ट्रेलर, वाळू, रेतीच्या वाहतुकीचे ट्रक यांची वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. या काळात गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने या महामार्गावरील अवजड वाहतूक या काळात बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मंत्री रावते म्हणाले की, गणेश चतूर्थी निमित्ताने कोकणवासीयांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात येते. तसेच या महामार्गावरुन जड वाहने व रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाहतूकीमुळे या कालावधीत कोकणाकडे ये – जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून वाहनांची कोंडी होऊन प्रवाशांची गैरसोय होते, त्यामुळे दिनांक १ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर दरम्यान विविध टप्प्यात हे निर्बंध लागू राहतील. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक हितास्तव या महामार्गावर हे निर्बंध लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे निर्बंध दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सीजन व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही, अशी माहितीही परिवहन मंत्री रावते यांनी दिली.

या आदेशांद्वारे पनवेल ते इन्सुली ( सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र. १७) (पनवेल ते सिंधुदूर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठाणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी) वरुन होणारी वाळू , रेती भरलेले ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. दि. १ सप्टेंबर २०१६ (००.०१ वा.) ते दि. ५ सप्टेंबर २०१६ (२०.००वा.) या कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ज्यांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे, अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहील.

दिनांक ६ सप्टेंबर २०१६ ते दिनांक १४ सप्टेंबर २०१६ या कालावधीत या महामार्गावर सकाळी ०८.०० ते रात्री २०.०० वा. या दरम्यान सर्व प्रकारची जड-अवजड वाहने, ट्रेलर, वाळू / रेतीच्या वाहतुकीचे ट्रक यांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

पाच दिवसाचे गणपती, गौरी विसर्जन व सात दिवसांचे गणपती विसर्जन निमित्त दिनांक ९ सप्टेंबर २०१६ रात्री २०.०० वाजेपासून ते दि. १२ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ०८.०० वाजेपर्यंत या मार्गावर होणारी वाळू / रेतीची ट्रकची, ट्रेलरची तसेच अवजड वाहने ज्याची वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे, अशा सर्व वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. अनंत चतुर्दशी गणपती विसर्जनानिमित्त दिनांक १५ सप्टेंबर २०१६ (०८.०० वा. पासून) ते दिनांक १६ सप्टेंबर २०१६ (२०.०० वा. पर्यंत) या कालावधीत वाळू/ रेतीच्या वाहतूकीस व अवजड वाहने ज्यांची क्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा वाहनांच्या वाहतूकीवर पूर्णतः बंदी करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. दिनांक ०१ सप्टेंबर २०१६ रोजी ००.०१ वाजेपासून दिनांक १६ सप्टेंबर २०१६ रोजी २४.०० वा. या कालावधीत वाळू / रेतीच्या वाहतूकीस पूर्णत: बंदी राहील.

The post मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवा दरम्यान जड वाहतुकीवर निर्बंध appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *