March 12, 2017

भारताच्या पाणबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती लीक

Written by

submarine

submarine
नवी दिल्ली – फ्रान्समधील डीसीएनएस या पाणुबड्यांची बांधणी करणाऱ्या कंपनीची तब्बल २२,००० पानांची कागदपत्रे लीक झाल्यामुळे भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दलची संवेदनशील माहिती लीक झाल्याचे उघड झाले आहे. याबाबतचे वृत्त ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दलच्या गुप्त माहितीचा समावेश या कागदपत्रांमध्ये असल्याचे समजत आहे. दरम्यान संबंधित यंत्रणांक़डून या वृत्ताला अद्यापही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. माहिती हॅक झाल्याची शक्यता व्यक्त करत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी नौदलप्रमुखांना याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

याबाबत सूत्रांच्या माहितीनुसार, नुकतेच ऑस्ट्रेलियासाठी १२ पाणबुड्यांच्या डिझायनिंगचे कंत्राट डीसीएनएस या कंपनीला मिळाले होते. यामध्ये पाणबुड्यांचे सेन्सर्स, युद्ध व्यवस्थापन यंत्रणा, पाणतीर (टॉर्पेडो) प्रक्षेपण प्रणाली आणि पाणबुडीतील संपर्क व दिशादर्शन प्रणालीचा समावेश होता.

मे २०१६ मध्ये भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन प्रकारातील पहिली पाणबुडी असणाऱ्या कलावरीची समुद्रात चाचणी घेण्यात आली असून ही पाणबुडी लवकरच नौदलात दाखल होणार आहे. याशिवाय, आगामी २० वर्षांत अशाच सहा स्कॉर्पिअन पाणबुड्या नौदलात दाखल होणार आहेत. लीक झालेल्या माहितीमध्ये पाणबुड्यांमधील युद्ध यंत्रणेचा तपशील असण्याची शक्यता आहे. याशिवाय, पाण्याखालून प्रवास करताना पाणबुड्यांच्या होणाऱ्या आवाजाचाही तपशील यामध्ये आहे. त्यामुळे शत्रूंना भारतीय पाणबुड्यांचा सहजपणे शोध लागण्याचा धोका आहे.

कोणतीही तांत्रिक माहिती ऑस्ट्रेलियन पाणबुड्यांच्या डिझायनिंगबद्दल उघड झालेली नाही. तसेच भारतातूनच पाणबुड्यांची संवेदनशील माहिती उघड झाल्याचा दावा, डीसीएनएस कंपनीने केला आहे. ऑस्ट्रेलियन व्यवस्थेत अनियंत्रित तांत्रिक माहिती असण्याची शक्यता नाही. डीसीएनएसकडे असलेली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी बहुस्तरीय आणि स्वतंत्र व्यवस्था अस्तित्त्वात आहे. याशिवाय, या माहितीची देवाणघेवाणही सांकेतिक भाषेत होते. त्यामुळे डीसीएनएसने दिलेल्या डिझायनिंगप्रमाणे काम करणाऱ्या भारतातील स्थानिक कंपनीतून ही माहिती उघड झाल्याची शक्यता आहे. डीसीएनएसची जबाबदारी फक्त माहितीची सुरक्षित देवाणघेवाण करण्यापर्यंत आहे. या माहितीचे नियंत्रण करणे आमचे काम नाही, असा दावा डीसीएनएसकडून करण्यात आला आहे.

The post भारताच्या पाणबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती लीक appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *