March 12, 2017

भागवत यांनी जुनाच बुरसटलेला विचार नव्याने मांडला

Written by

samna

samna
मुंबई – शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंना मुले जन्माला घालण्यापासून कोणी रोखले आहे, असे वक्तव्य केल्यानंतर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘सामना‘तील अग्रलेखातून शिवसेनेने आपले मत मांडले आहे.

मुसलमानांची वाढती लोकसंख्या चिंतेचीच बाब आहे, पण म्हणून त्यांच्याप्रमाणे हिंदूंनीही पोरांचे लटांबर वाढवायचे हा विचार देशहिताचा आहे असे संघशिस्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्य करणार नसल्याचे मत शिवसेनेने मांडले आहे. शिवसेनेने म्हटले आहे की, जुनाच बुरसटलेला विचार मोहन भागवत यांनी नव्याने मांडला आहे. इतर धर्मीय लोक जर अनेक मुलांना जन्म देऊ शकतात तर हिंदूंना कोणी रोखले आहे? सरसंघचालकांनी केलेले विधान सुसंस्कृत व पुरोगामी हिंदू समाजाला पचनी पडणारे नाही.

मोदी यांनी गोमांस प्रकरणात इतर हिंदू संघटनांपेक्षा वेगळी भूमिका आधीच घेतली आहे व गोरक्षणाच्या नावाखाली काही लोकांनी धंदा सुरू केला आहे असे मोदी यांनी फटकारल्यापासून शंकराचार्य व इतर साधुसंतांनी मोदींवर टीका केली. देशात कुटुंब नियोजनावर भर दिला जात आहे व सरकार या कार्यक्रमांवर प्रचेड पैसा खर्च करीत आहे. हिंदुस्थानची लोकसंख्या सव्वाशे कोटींवर जाऊन पोहोचली व त्यात मुसलमानांचा भरणा जास्त आहे. मुसलमानांची लोकसंख्या रोखली गेली नाही तर तर हिंदुस्थानचा सामाजिक, सांस्कृतिक समतोल बिघडेल हे खरेच, पण त्यासाठी हिंदूंनी अधिक मुलांना जन्म देणे हा उपाय नसून देशात समान नागरी कायदा लावून मुसलमानांसह सर्वच धर्मियांवर कुटुंब नियोजनाची सक्ती करणे हाच मार्ग आहे. हिंदूंनी जास्त मुलांना जन्म दिल्याने आधीच हलाखीत जगणारे लोक बेरोजगारी, भूक, महागाईने अधिकच होरपळतील व लोकसंख्यावाढीचे अराजक निर्माण होईल ते वेगळेच.

ज्याप्रमाणे मुसलमानांची मुले जास्त आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या बायकाही जास्त आहेत. मग हिंदूंनीही एकापेक्षा जास्त लग्ने करावीत, असा फतवा काढून सरकारला तसा कायदा करायला लावणार आहात काय? भागवत हे सरसंघचालक आहेत. त्यांनी अशी विधाने करू नयेत. साध्वी प्राची, साक्षी महाराज, प्रवीण तोगडिया यांनीही हिंदूंनी पोरांची लटांबरे वाढवून मुसलमानांना शह द्यावा, असा दिव्य विचार यापूर्वी मांडला आहे. सरसंघचालकांनीही त्याचीच ‘री’ ओढू नये. कारण ते सरसंघचालक असल्यामुळे ‘सरसंघचालक, तुम्हीसुद्धा?’ असा प्रश्‍न एखाद्याच्या मनात आलाच तर त्याला काय उत्तर आहे? खरे म्हणजे हे विचार म्हणजे हिंदुत्वास लागलेली जळमटे आहेत. त्यापेक्षा समान नागरी कायदा व सक्तीच्या कुटुंब नियोजनाचा आग्रह सरसंघचालक का धरीत नाहीत?, असा प्रश्नही शिवसेनेने उपस्थित केला आहे.

The post भागवत यांनी जुनाच बुरसटलेला विचार नव्याने मांडला appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *