March 12, 2017

धोकादायक स्थितीत आहेत राज्यभरातील निम्म्याहून अधिक धरणे : विजय पांढरे

Written by

vijay-pandhare

vijay-pandhare
पुणे – जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक धरणे धोकादायक परिस्थितीत आहेत, अशी धक्कादायक माहिती दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून राज्यातील सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता आहे, मात्र राजकीय पुढारी हे करतील असे वाटत नाही, असेही पांढरे म्हणाले.

जलसंपदा विभागाचे वास्तव मांडण्याची सुसंधी असलेल्या माधवराव चितळे समितीने प्रत्यक्षात विभागातील भ्रष्टाचारावर पांघरूणच घातले, असा आरोपही पांढरे यांनी या वेळी केला. आम आदमी पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत पांढरे यांनी जलसंपदा विभागाचे वास्तव मांडले. आम आदमी पक्षाच्या राज्य समन्वयक प्रीती शर्मा मेनन व शहरप्रमुख राकेश चौधरी या वेळी उपस्थित होते.

कॅबिनेट मंत्र्यांची धरणांना मंजुरी देणाऱ्या प्रस्तावावर सही असते. धरणांत झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात अभियंता आणि मुख्य अभियंता यांच्यावर गुन्हे दाखल करताना मंत्र्याला का वगळले जाते, असा प्रश्न पांढरे यांनी विचारला. जलसंपदा विभागाचे तत्कालीन मंत्री सुनील तटकरे व अजित पवार यांना पाठीशी घालण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे, असेही ते म्हणाले.

धरणांची गळती ही गंभीर बाब असूनही सरकारी अधिकारी याबाबत जनतेची दिशाभूल करतात. धरणांतून आवश्यक गळतीपेक्षा कित्येक पट अधिक गळती होत आहे. धरणांना मूळ बळकटी देणे शक्य नसले तरी गळती नक्की कमी करणे शक्य आहे. नाशिकच्या ‘मेरी’ संस्थेत असताना मी राज्यातील धरणांची तपासणी केली होती. १३६ पैकी निम्म्याहून जास्त धरणे धोकादायक आहेत. धरणांना धोका नाही, या दाव्यात तथ्य नाही.

The post धोकादायक स्थितीत आहेत राज्यभरातील निम्म्याहून अधिक धरणे : विजय पांढरे appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *