March 12, 2017

चिनी अतिक्रमणाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज

Written by

china

china
अरुणाचलमध्ये लढाऊ विमान तैनात
नवी दिल्ली: ईशान्येकडील राज्यांमध्ये चिनी सैन्याची वारंवार होणारी घुसखोरी आणि अतिक्रमण यामुळे निर्माण झालेल्या धोक्याला तोंड देण्यासाठी भारताने आक्रमक पावले उचलली आहेत. त्या दृष्टीने प्रथमच अरुणाचल प्रदेशात सुखोई हे लढाऊ विमान तैनात करण्यात आले आहे.

ईशान्य भारतात चीनकडून वारंवार घुसखोरी केली जात आहे. अरुणाचल प्रदेशावर चीन आपला दावा सांगत आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या घुसखोरीला अथवा अतिक्रमणाला तोंड देताना आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास सीमेवरील सैन्याला तातडीने मदत पोहोचविता यावी; यासाठी अरुणाचल प्रदेशातील पासीघाट येथे उभारलेल्या तात्पुरत्या हवाई तळाची डागडुजी करून त्या ठिकाणी सुखोई तैनात करण्यात आले आहे. सन १९६२ च्या युद्धात सैन्याला रसद पुरविण्यासाठी हा तळ उभारण्यात आला होता. युद्धानंतर तो बंद करण्यात आला.

मात्र चीनचे वाढते अतिक्रमण लक्षात घेऊन पासीघाट हवाई धावपट्टीवर उगवलेले गवत काढून ती वापरण्यायोग्य करण्यात आले आहे. या नूतनीकरण करण्यात आलेल्या धावपट्टीचे उदघाटन गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांच्या हस्ते करण्यात आले.

चीनच्या आक्रमक हालचालींना चोख उत्तर देण्याच्या उद्देशाने भारताने यापूर्वीच अंदमान-निकोबार द्वीपसमूहात अधिक संख्येने ‘सुखोई ३० एमकेआय’ ही लढाऊ विमाने तैनात केली आहेत. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यांच्या सीमावर्ती भागात टेहळणीसाठी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे सज्ज ठेवली आहेत. लद्दाखच्या पूर्व भागात रणगाड्यांची पलटण तैनात करण्यात आली असून त्या ठिकाणी सैनिकांची संख्याही वाढविण्यात आली आहे.

The post चिनी अतिक्रमणाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *