March 12, 2017

क्रीडा क्षेत्राविषयी आत्मपरीक्षण

Written by

rio2

rio2
ब्राझीलमधील रिओ द जनेरिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची काही प्रगती दिसेल अशी अपेक्षा असतानाच भारताची अधोगती झाली आहे. गतवर्षी झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सहा पदके मिळालेली असताना यावर्षी भारतीय चमूला दोन पदकांची प्राप्ती होऊ शकली आहे. ती सुध्दा क्रीडा स्पर्धा संपता संपता झाली. अन्यथा स्पर्धा सुरू असेपर्यंत भारतीय क्रीडा प्रेमी जनतेच्या मनात नैराश्याचे ढगच दाटून आले होते. परंतु साक्षी मलिकने ५८ किलो वजनी गटातील कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवले आणि पी. व्ही. सिंधू हिने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक मिळवून भारताची पदकांची प्रतीक्षा संपवली. पदकांची कमाई सहा वरून निदान दहावर अपेक्षा असताना ती कमी झाली ही भारतीय मनाला निराश करणारी गोष्ट आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतामध्ये आपल्याला ऑलिम्पिकमध्ये पदके का मिळत नाहीत या विचाराच्या अनुरोधाने आत्मपरीक्षण सुरू झालेले आहे. या आत्मपरीक्षणाला एक नकारात्मकतेची झालर असते आणि या मनःस्थितीमध्ये फार तर्कशुध्द आणि विवेकपूर्ण आत्मपरीक्षण होतेच असे नाही. मात्र या निमित्ताने मोठे मंथन होते त्यातले तथ्यांशाचे लोणी आपण प्राप्त केले पाहिजे.

आपल्या देशामध्ये क्रीडा क्षेत्राविषयी जेव्हा जेव्हा विचारमंथन होते तेव्हा आपल्या देशातले क्रीडा प्रेमी क्रिकेटला भरपूर शिव्या देतात आणि आपण क्रिकेटवर अनावश्यक भर देऊन अन्य क्रीडा प्रकारांकडे दुर्लक्ष करत असतो असा ठपका ठेवतात. आपल्या क्रिकेटला धर्मच मानले जाते. हा ब्रिटिशांचा खेळ आहे. त्यामुळे विसाव्या शतकापर्यंत ज्या देशावर ब्रिटिशांचे राज्य होते त्या देशात क्रिकेट खेळले जाते. बाकीच्या जगामध्ये विशेषतः यूरोप, अमेरिका, चीन आणि जपान या विविध क्रीडा प्रकारात आघाडीवर असलेल्या देशांमध्ये क्रिकेटला स्थान नाही. असे असले तरी आपल्या देशात क्रिकेट खेळले जाते यात काही चूक नाही. क्रिकेटवर भर दिला आहे म्हणून हॉकीकडे दुर्लक्ष झाले आहे असे नाही. एकूणच क्रीडा क्षेत्राकडे आपले दुर्लक्ष आहे आणि क्रिकेटवर मात्र पैशांचा धो-धो पाऊस पडत असतो. ही तफावत क्रीडा प्रेमींना डाचत राहते. तेव्हा सरकारने क्रिकेटवरचे प्रेम कमी न करता अन्यही क्रीडा प्रकारांना यथोचित महत्त्व दिले पाहिजे तसे ते दिल्याशिवाय क्रीडा क्षेत्रात आपली आगेकूच होणार नाही. हे सांगायला कोणा क्रीडा समीक्षकाची किंवा अभ्यासू क्रीडा तज्ञाची गरज नाही. ही साहजिकपणे लक्षात येणारी गोष्ट आहे. पण भारतीयांची मानसिकता आडवी येते. आपण खेळाला फार महत्त्व द्यायलाच तयार नाही.

आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनींच्या पालकांच्या मनाचा कानोसा घेतला आणि त्यांच्या पाल्याविषयी कोणत्या महत्त्वाकांक्षा आहेत यांचा अंदाज घेतला तर बहुसंख्य पालकांचे उत्तर, आपल्या मुलाने इंजिनिअर व्हावे किंवा डॉक्टर व्हावे किंवा भरपूर पैसा मिळवून देणार्‍या व्यवसायात त्याने जावे असेच येईल. १०० पालकांचा कानोसा घेतला तर त्यातला एकही पालक आपल्या मुलाने खेळाडू व्हावे असे उत्तर देणार नाही आणि ही दयनीय अवस्था असणारे पालकांकडून मुलांना खेळण्यासाठी पुरेसे प्रोत्साहन मिळत नाही. तिथून आपल्या अधोगतीची खरी सुरूवात होते. पालकांनाच मुळात खेळाडू होणे म्हणजे वाया जाणे असे वाटत असते. खेळाडूलासुध्दा चांगला पैसा मिळू शकतो. अशी पूर्वीची स्थिती नव्हती पण आता ती बदलली आहे आणि खेळाडूसुध्दा आता पैसा कमवायला लागले आहेत. परंतु खेळाडू होण्याचे करिअर आपल्या मुलाने करावे असा विचार असून बळावत नाही. त्यामुळे घरातूनच खेळाला विरोध होतो. बाकीच्या पातळ्यांवर तर काही विचारायलाच नको. सगळीकडेच खेळाची उपेक्षा होत असते.

काही वेळा असाच प्रश्‍न मनात येतो की भारताचे हवामान किंवा शिक्षण व्यवस्था यामध्ये काही खोट आहे की काय? खरे म्हणजे भारताच्या हवामानात काही दोष नाही. तसा तो असता तर आपल्या देशात क्रिकेट एवढे वाढलेच नसते. परंतु राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय पातळीवर खेळाडू चमकायचे असतील तर त्यांची तयारी आणि निवड ही उच्च शिक्षणाच्या पातळीवरच होत असते. तेव्हा भारतातली जी मुले किंवा मुली अंगी खेळाडूचे गुणधर्म असून उच्च शिक्षण घेतात त्यांनाच खेळाडू म्हणून करिअर करण्याची संधी मिळते. दुर्दैवाने भारतामध्ये उच्च शिक्षण घेणार्‍या मुलामुलींचे प्रमाण केवळ दहा टक्के आहे. ज्या ९० टक्के मुलांना शिक्षणाची संधीच मिळत नाही. त्या मुलांच्या अंगी क्रीडा गुण असले तरीही ते प्रगट करण्याची संधी त्यांना मिळत नाही. अशी कितीतरी मुले आणि मुली भारतामध्ये आहेत. तेव्हा या क्रीडा गुण असलेल्या मुलांमधून ऑलिम्पिकचे खेळाडू निवडले तर भारतालाही अनेक पदके मिळू शकतात. तेव्हा भारताला आपली ही चूक दुरूस्त करायची असेल तर शिक्षणाचे प्रमाण वाढवावे लागेल आणि तूर्तास उच्च शिक्षणापासून दूर असलेल्या पण अंगी क्रीडा गुण असलेल्या तरुण तरुणींना शोधून त्यांना क्रीडा शिक्षण द्यावे लागेल. भारतातल्या आदिवासींमध्ये अशी क्षमता फार मोठी आहे. परंतु क्रीडा गुणांचे हे धन लपलेले आहे ते शोधावे लागेल.

The post क्रीडा क्षेत्राविषयी आत्मपरीक्षण appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *