March 12, 2017

कणखर राजकीय भूमिकेतूनच सुटेल काश्मीर प्रश्न

Written by

supreme-court

supreme-court
नवी दिल्ली- कणखर राजकीय भूमिकेतूनच काश्मीर प्रश्नावर खरा तोडगा निघू शकेल, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. केवळ न्यायालयीन निकषावर प्रत्येक प्रश्न सुटू शकत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जम्मू-काश्मीर नॅशनल पँथर पार्टीचे नेते भीम सिंग यांनी याचिका दाखल केली होती. काश्मिरात राज्यपाल राजवट लागू करावी, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. धनंजय चंद्रचूड यांनी आपले मत व्यक्त केले.

काश्मीर प्रश्नाला विविध पैलू असून त्याचा तोडगा राजकीय भूमिकेतूनच काढला जाऊ शकतो. प्रत्येक प्रश्नावर केवळ न्यायालयीन निकषातून उत्तर मिळू शकत नाही, असे न्यायालयाने सांगितले. केंद्र सरकारच्या सॉलिसिटर जनरलनी याचिकादार भीम सिंग यांना पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी मदत करावी. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. त्या शिष्टमंडळात तुम्हीही सामील व्हावे, असेही न्यायालयाने सुचवले.

त्यावर भीम सिंग म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशावर चालणा-या या सरकारने आपणास आमंत्रित केले नाही. त्यावर खंडपीठाने सांगितले की, तुम्ही राजकीय वक्तव्य करू नये. तुमची बाजू राजकीय नेतृत्वाकडे मांडावी. काश्मीर खो-यातील परिस्थितीचा अहवाल केंद्र सरकारने सादर केला आहे. त्यावर सिंग यांनी मत नोंदवावे. भीम सिंग यांची मागणी न्यायिक कक्षेपेक्षा राजकीय कक्षेत येते, असे मत न्यायालयाने नोंदवले.

सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार म्हणाले की, पंतप्रधानांची भेट घेण्याबाबत आपण व्यक्तिश: गृह सचिवांशी चर्चा करू. काश्मीर खो-यातील परिस्थिती निवळत चालली असून केवळ तीन जिल्ह्यांमध्ये संचारबंदी आहे. सुरक्षा दल, जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच राज्यातील परिस्थिती सुधारली आहे., असे कुमार यांनी न्यायालयाला सांगितले. भीम सिंग यांनी केलेल्या याचिकेत सुरक्षा दलांकडून होणारा पॅलेट गनचा वापर, औषधांचा अपुरा साठा, वैद्यकीय सुविधांचा तुटवडा आदींची माहिती दिली होती.

The post कणखर राजकीय भूमिकेतूनच सुटेल काश्मीर प्रश्न appeared first on Marathi News paper Online Maharashtra latest articles.

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *